Header Ads

ad728
  • Breaking News

    पृथ्वी-चंद्राचे वय सहा कोटी वर्षांनी जास्त??

    शास्त्रज्ञांच्या यापूर्वीच्या अंदाजानुसार मानलेल्या वयापेक्षाही पृथ्वी व चंद्राचे वय जवळपास सहा कोटी वर्षांनी जास्त असल्याचे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. या नव्या संशोधनानुसार पृथ्वीचे वय ४.५४ अब्ज वर्षांऐवजी ४.६0 अब्ज इतके तर चंद्राचे वय ४.५२ अब्ज वर्षांऐवजी ४.५८ अब्ज वर्षे इतके असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.


    पृथ्वीच्या वयाची निश्‍चिती करण्यासाठी केलेल्या प्रयोगांदरम्यान शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळातील मात्र आतापर्यंंत चांगल्या अवस्थेत असलेल्या काही वायूंमधील बदलाचा अभ्यास केला. दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियात सापडलेल्या ३.४ अब्ज वर्षांंपूर्वीच्या क्झेनॉन वायूचा अभ्यास केला असता शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे. कॅलिफोर्नियाच्या साक्रामेन्टो येथे मागील आठवड्यात पार पडलेल्या गोल्डश्मिड्ट जिओकेमिस्ट्री परिषदेदरम्यान शास्त्रज्ञांनी हा शोध प्रबंध सादर केला.
    पृथ्वी व चंद्राच्या उत्पत्तीविषयी शास्त्रज्ञांच्या मनातील संभ्रम अजूनही दूर झाला नसल्याचे एका नव्या संशोधनातून दिसून येत आहे. फ्रान्सच्या नॅन्सीमधील लोरेन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या एका नव्या संशोधनातून पृथ्वीची उत्पत्ती ४.५४ अब्ज वर्षांऐवजी ४.६0 अब्ज वर्षांपूर्वी झाल्याचे समोर आले आहे. तर चंद्राची उत्पत्तीही ४.५२ अब्ज वर्षांऐवजी ४.५८ वर्षांपूर्वी झाल्याचे या संशोधनात म्हटले आहे. पृथ्वीच्या निर्मितीचे कोडे उलगडण्यासाठी संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार सौरमालेची निर्मिती झाल्यानंतर ४ कोटी वर्षांनी पृथ्वीची निर्मिती झाली आहे. यापूर्वीच्या संशोधनानुसार सौरमालेच्या निर्मितीनंतर दहा कोटी वर्षांनी पृथ्वीची उत्पत्ती झाल्याचे मानले जात होते. पृथ्वीच्या निर्मितीचे नेमके वर्ष सांगणे कठीण आहे. मात्र, आपण विचार करतो त्यापेक्षा पृथ्वीचे वय सहा कोटी वर्षांनी जास्त असल्याचे या संशोधनाचे प्रमुख गुईलॉमे अव्हाईस यांनी या वेळी सांगितले. त्यामुळे चंद्राचे वयही आपसूकच सहा कोटी वर्षांंनी वाढते. कारण चंद्राची निर्मिती पृथ्वीच्या निर्मितीनंतर दोन कोटी वर्षांनी झाली होती, असे अव्हाईस म्हणाले.



    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Top Ad

    ad728

    Post Bottom Ad

    ad728